नवी दिल्ली- देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांसोबतच लहान मुलंही मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहेत. यातच नवजात मुलं गंभीर संक्रमित होत त्यांचा जीव जात असल्यानं हाहाकार माजला आहे. तज्ज्ञांनुसार, कोरोनानं त्याचं रुप बदललं असून तो आधीपेक्षा भयंकर संक्रमण करत आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यानं ते सर्वाधिक संक्रमित होत आहेत. दिल्लीच्या एनसीआरसह हरियाणा ते गुजरातपर्यंत कोरोना संक्रमित लहान मुलं संक्रमित होण्याची संख्या जास्त आहे.
गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, वडोदरा येथे कोरोना संक्रमण वेगाने पसरत आहे. सूरतच्या न्यू सिविल हॉस्पिटलमध्ये १४ दिवसाच्या चिमुरड्याचा कोरोना संक्रमणामुळे जीव गेला आहे. मल्टीपल ऑर्गन फेल झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर म्हणाले. तर सूरतच्या दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटल १४ दिवसांची लहान मुलगी व्हेंटेलिटरवर गंभीर अवस्थेत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये १५ टक्के मृत्यू तरूणांचा आहे. राज्यात मागील २४ तासांत ७ हजार ४१० कोरोनाबाधित आढळले तर ७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोना बाधितांमध्ये लहान मुलं पहिल्या लाटेच्या तुलनेत आता अधिक संक्रमित होत आहेत. कोरोना संक्रमणामुळे लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागत आहे. लोकनायक हॉस्पिटलमध्ये अशा गंभीर संक्रमण असलेल्या ८ मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यात ८ महिन्यापासून १२ वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. या मुलांमध्ये अतिताप, न्यूमोनिया यासारखी लक्षणं सापडत आहेत.
या वर्षी १ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत १३० मुलं कोरोनाबाधित आढळली. यातील नवजात मुलांसह १७ वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. १ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत गाजियाबादमध्ये २१०६ कोरोनाबाधित आढळले त्यात १३० मुलांचा समावेश आहे. यात ० ते १४ वयोगटातील ९७ मुले आहेत. १५ ते १७ वयोगटातील ३३ मुले आहेत. कंबाइंड हॉस्पिटलमध्ये एक ८ महिन्याचा मुलगा कोरोना संक्रमित होता. त्याच्या आईवडिलांनाही कोरोना झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हरियाणात १५ मार्च ते ११ एप्रिलमध्ये ४१ हजार ३२४ कोरोनाबाधित आढळले. त्यात ३ हजार ४४५ लहान मुलं होती. या सर्वांचे वय १० वर्षापेक्षा कमी आहे. मागच्या वर्षी ५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत कोरोना संक्रमित होणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या १ टक्के होती ती वाढून यंदा ८ टक्के झाली आहे.