भोपाळ - देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या 1270 वर पोहोचली असून कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, अनेक राज्यांत रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातही चौहान सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली असून येथील उपजिल्हाधिकारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
आलीराजपूरच्या उपजिल्हाधिकारी लक्ष्मी गामड यांनी फेसबुक अकाऊंटवरुन रात्रीच्या संचारबंदीवरुन सरकारवर निशाणा साधला होता. कोरोनाला कसं माहिती पडलं की, रात्री 11 वाजता बाहेर पडायचं आणि पहाटे 5 वाजता बिळात लपून बसायचं, अशी फेसबुक पोस्ट एसडीएम गामड यांनी केली होती. त्यानंतर, सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. या पोस्टमध्ये गामड यांनी लोकांनाही आवाहन केलं होतं. मला हे लक्षात येत नाही, जर तुम्हाला समजत असेल तर मलाही सांगा, असेही त्यांनी म्हटलं होतं.
लक्ष्मी गामड यांना ही पोस्ट केल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, या नोटीसला उत्तर देण्यासही बजावले आहे. आपणच ही पोस्ट केली की नाही याचा खुलासा मागविण्यात आला असून पोस्टचे निरीक्षण करण्यात येत आहे. तसेच ही पोस्ट करण्यामागे आपला हेतू काय होता, असेही जिल्हाधिकारी यांनी विचारले आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकारी यांच्या या पोस्टचे अनेकांनी समर्थन केलं असून काहींनी सरकारी नियमांची खिल्ली उडविल्याचीही भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, सध्या लक्ष्मी गामड यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.