नवी दिल्ली : अत्यंत घातक अशा कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा उगम जेथून झाला त्या चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा स्थितीत चीनच्या अडचणींमुळे खासकरून निर्यात व्यापारात रिकामी झालेली जागा घेण्याची भारतास संधी आहे. देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला हवी तशी गती येत नसताना ही संधी साधता आली तर कोरोनाचे संकट भारताच्या दृष्टीने इष्टापत्तीही ठरू शकेल, अशी आशा व्यापार-उद्योग क्षेत्राच्या ‘असोचेम’ या शीर्षस्थ संघटनेने व्यक्त केली आहे.इलेक्ट्रॉनिक्स, औषधी, विशेषत: रासायनिक आणि वाहन क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंच्या प्रकोपामुळे उद्योगांच्या या क्षेत्रांना कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा तुटवडा भेडसावत आहे; परंतु, याखेरीज कोरोनामुळे स्थानिक व्यावसायिकांसाठी संधीची दारे खुली झालेली इतरही अनेक क्षेत्रे आहेत. काही क्षेत्रे सोडल्यास भारत बºयाच प्रमाणात अभियांत्रिकी निर्यात बाजारातील चीनची रिकामी जागा घेऊ शकतो. चामडे व चामड्याच्या वस्तू या क्षेत्रातही अशीच स्थिती आहे, असे ‘असोचेम’चे सरचिटणीस दीपक सूद यांनी सांगितले. चीनमधील निर्यातदार पुरवठा सुरळीत करेपर्यंत भारताला अनेक क्षेत्रांत स्पर्धकांपेक्षा आपली उत्पादने अधिक दर्जेदार करावी लागतील. भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेने चीनमुळे रिकामी होणारी बाजारातील रिकाम्या जागेची उणीव भरून काढणे जरुरी आहे, असेही सूद म्हणाले.चीनचे उत्पादन निच्चांकी पातळीवर...चीनमधील कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन जवळपास ठप्पच पडले आहे. क्रय व्यवस्थापन निर्देशांकानुसार फेब्रुवारी महिन्यात चीनच्या कारखानदारी क्षेत्रातील उत्पादन वीस वर्षांतील नीचांक पातळीवर आले आहे. परिणामी जागतिक बाजारावर याचे गंभीर परिणाम होणे स्वाभाविक आहे. अशात पुढच्या काही महिन्यांत भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात मोठी संधी मिळू शकते, असे असोचेमने म्हटले आहे.
वाईटातून चांगलं; कोरोनाचं संकट भारताला फळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:23 AM