- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात वेगाने फैलावत असून रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची पुणे व मुंबई भेट अडचणीत आली आहे. जॉन्सन एप्रिल २६-२७ रोजी नवी दिल्लीला भेट देणार असून ते पुणे, मुंबईलाही भेट देण्याचा विचार करीत आहेत. पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ही जगातील सगळ्यांत मोठी लस उत्पादक कंपनी असून, पुणे शहराला भेट देण्यास जॉन्सन उत्सुक आहेत. एसआयआय ऑक्सफोर्ड ॲस्ट्राझेनेकाची लस कोविशिल्डचीही निर्मिती करीत आहे. ही लस तेथून जगातील अनेक देशांना निर्यात केली गेली आहे. ब्रिटिश अधिकारी जॉन्सन यांची पुणे भेट व्हावी यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. बोरिस जॉन्सन यांनी भारताला भेट देण्याचा विचार करण्याची ही दुसरी वेळ आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास जॉन्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. परंतु, इंग्लंडलाच कोविडच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला. तेथे लॉकडाऊन लागू करावे लागले. त्याचा परिणाम म्हणून त्यांचा भारत दौरा रद्द झाला.इंग्लंडमध्ये परिस्थितीत सुधारणा होत असल्यामुळे आणि भारताला कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला नाही तर एप्रिलमध्ये जॉन्सन यांचा दौरा निश्चित केला गेला आहे. तथापि, देशात ज्या आठ राज्यांत कोरोनाचा कहर सुरू आहे त्यात महाराष्ट्र आहे. सर्वांत जास्त कोरोना रुग्ण नोंदवले जात आहेत त्या जिल्ह्यांत पुणे आणि मुंबई आहे. शुक्रवारपासून पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे.
कोरोना संकट : इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन यांची पुणे, मुंबई भेट अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:35 AM