नवी दिल्ली - काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता. यावर आरोग्य मंत्रालयाकडून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही केंद्राल प्रश्न विचारत जुन्या बातम्या शेअर केल्या आहेत.
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राज बब्बर यांनी रिक्षात आपल्या नवऱ्याला तोंडातून ऑक्सीजन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आग्र्यातील रेणु यांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच, रेणू यांनी पतीला वाचविण्यासाठी आपला प्राण पणाला लावला होता. त्यावेळी जर ऑक्सिजन मिळाला असता तर त्यांच्या पतीचा जीव वाचला असता, असेही राज बब्बर यांनी म्हटलं आहे.
प्रियंका गांधींनी व्यक्त केला संताप
ऑक्सिजनवरून देशात सध्या राजकारण तापलं असून प्रियंका गांधींनी मोदी सरकारला चांगलंच सुनावलं आहे. कोरोना काळात देशात अधिक मृत्यू का झाले याचं कारण सांगत गंभीर आरोप केला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कोरोना संकटाच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत ७००% वाढ केली. त्यामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नाही" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
डॉ. भारती पवार यांनी दिली माहिती
"कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची नियमितपणे माहिती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. पण कोणत्याही राज्याने किंवा केंद्र शासित प्रदेशानं ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिलेली नाही", असं उत्तर नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याचं मात्र आरोग्य मंत्रालयानं मान्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.
दुसऱ्या लाटेत वाढली मागणी
पहिल्या लाटेत ३,०९५ मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी होती. तर दुसऱ्या लाटेत यात दुपटीनं वाढ होऊन ९ हजार मेट्रीक टनपर्यंत पोहोचली, अशी माहिती सरकारनं संसदेत दिली. दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत १०,२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आहे. सर्वाधिक १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना पुरविण्यात आला, तर दिल्लीला ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला अशीही माहिती केंद्रानं संसदेत दिली आहे.