नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून एका भाजपाआमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराला 24 तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. आता, या आमदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 18 एप्रिल रोजी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं.
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,01,187 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाही वेळेत बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. त्यामध्ये, आपल्याला बेड मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
आमदार केसर सिंह यांचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामुळे सरकारच्या कामकाजावर आणि आरोग्य यंत्रणेवर टीका करण्यात येत आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारीची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
भाजपा अध्यक्षांनी व्यक्त केला शोक
यूपी भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आमदार केसर सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेले हे सत्ताधारी भाजपाचे तिसरे आमदार आहे. याआधी औरेयातील आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.