नवी दिल्ली-
कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे. बऱ्याच राज्यांमध्ये स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. राजधानी दिल्लीत तर संक्रमणाचा दर १० टक्क्यांच्या पलिकडे गेला आहे आणि रुग्णांचा आकडा देखील २०० च्या पलिकडे गेला आहे. याच पद्धतीनं गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ४५० नवे रुग्ण आढळून आले आहेत तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
दिल्लीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रुग्णसंख्या वाढत आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१४ नवे रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब अशी की दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट ११ टक्क्यांहून अधिक आहे. तसंच दिल्लीत सध्या कोरोना चाचण्यांची संख्या देखील कमी आहे. गेल्या २४ तासांत फक्त १८११ लोकांच चाचणी झाली आहे आणि यात २१४ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्हीटीचा दर पाहता दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक आहे. शनिवारी दिल्लीतील पॉझिटिव्हीटी रेट ४.९८ टक्के इतका होता. तर शुक्रवारी ६.६६ टक्के इतका होता. पण आज पॉझिटिव्हीटीचा रेट थेट ११.८२ टक्क्यांवर गेला आहे.
महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण वेगानं वाढत आहेत. गेल्या २४ तासांत ४५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसंच कोरोनामुळे मृत्यू होण्याच्याही घटना सुरू झाल्या आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याचं चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी शनिवारी महाराष्ट्रात ४३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.