नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे दिल्लीच्या कालरा रुग्णालयात काम करणारी एक नर्स मरण पावल्याची घटना रविवारी घडली होती. रुग्णालयाने डॉक्टर वगळून नर्स व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई, ग्लोव्हज, मास्क यांचा पुनर्वापर करण्यास भाग पाडल्यानेच संसर्ग होऊन नर्स मरण पावली, असा आरोप होत आहे.
कालरा रुग्णालयात काम करणारी अंबिका पी. के. (वय ४७ वर्षे) या नर्सला कोरोनाची लागण झाल्याने सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी २१ मे रोजी दाखल करण्यात आले होते. या आजारामुळे मरण पावलेली ती दिल्लीतील पहिली नर्स आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कालरा रुग्णालयातील एका नर्सने आरोप केला की, या रुग्णालयातील डॉक्टरांना नवीन पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) देण्यात आले होते. मात्र नर्सनी जुन्याच पीपीई व अन्य साधनांचा पुनर्वापर करावा, असा आदेश देण्यात आला होता. त्याविरोधात नर्सनी आवाजही उठविला होता.
कालरा रुग्णालयाचे संचालकडॉ. आर. एन. कालरा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, सर्व कर्मचाºयांना पुरेसे पीपीइ व हँड सनिटायझर देण्यात आले होते. साधने कमी असल्याबद्दल रुग्णालयातील एकाही कर्मचाºयाने माझ्याकडे तक्रार केलेली नाही.