पणजी: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनासह ओमायक्रॉन व्हेरिएंटनेही चिंता वाढवली आहे. सरकारकडून वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पण, अजूनही लोक कोरोनाबाबत जागरुक दिसत नाहीत. नववर्षात गोवा राज्यात पर्यटकांची तोबा गर्दी जमते, यंदाही कोरोनाच्या सावटात गोव्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक जमलेले दिसले.
गोव्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे. तरीदेखील राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळावर नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. डिसेंबरमध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवासाठी गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. गोव्यातील गर्दीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओत गोव्यातील बीचवर मोठ्या संख्येने लोक जमलेले दिसत आहेत. @Herman_Gomes नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
गोव्यात कोरोना रुग्णांत वाढआरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गोव्यात रविवारी कोविड-19 चे 388 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. येथे संसर्गाचा दर 10 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ख्रिसमस सण ते नववर्ष या कालावधीत गोव्यात आलेल्या मोठ्या संख्येने पर्यटक हे राज्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांच्या पुढे जाण्यास कारणीभूत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 81 हजार 570 झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 3523 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण,123 मृत्यू आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 33,750 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासोबतच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 लाख 81 हजारांवर पोहोचला आहे. रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 3,42,95,407 लोक बरे झाले आहेत. तर कोट्यवधील लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.