नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात गंगा नदीत फेकलेल्या मृतदेहांवरुन वाद पुन्हा चिघळला आहे. सोमवारी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी विचारले की, कोरोना काळात गंगा नदीत किती मृतदेह फेकण्यात आले? त्यावर जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी लेखी उत्तर दिले. कोविड-19 संबंधित मृतदेह गंगा नदीत फेकल्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये अज्ञात मृतदेह गंगेत वाहून गेल्याच्या घटना प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. जलशक्ती मंत्रालयाने संबंधित राज्य सरकारांकडून गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचा अहवाल मागवला होता.
जलशक्ती राज्यमंत्र्यांच्या या लेखी उत्तरावरुन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसने जलशक्ती राज्यमंत्र्यांवर खोटी तथ्ये संसदेत मांडल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार शुभेंदू शेखर राय यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सरकार खोटे बोलत आहे. सरकार वस्तुस्थिती लपवत आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये मृतदेह गंगेत वाहत असल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते. गंगेत किती मृतदेह फेकले, हे सरकारने संसदेत सांगावे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संसदेचा अपमान आहे.
दुसरीकडे, सरकारकडे यापेक्षा असंवेदनशील आणि असभ्य उत्तर असू शकत नाही, असं आरजेडी खासदार मनोज झा म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, सरकार संसदेत वारंवार आकडे लपवत आहे. गेल्या सत्रात केसी वेणुगोपाल यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्र्यांनी सरकारकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणी केसी वेणुगोपाल यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना विशेषाधिकार भंगाची नोटीसही दिली आहे.