नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. कोरोनाचा धोका वाढला असून 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) नादिया जिल्ह्यातील एका निवासी शाळेतील किमान 29 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus Cases) लागण झाली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाहर नवोदय विद्यालय, कल्याणीच्या नववी आणि दहावीच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. संक्रमित विद्यार्थ्यांना खोकला आणि सर्दीची लक्षणे असल्याने त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे.
कल्याणी उपविभागीय अधिकारी (SDO) हिरक मंडळ यांनी शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांचीही कोरोना तपासणी केली जात आहे. रिपोर्ट आल्यावर याबाबत माहिती मिळेल. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन व्हेरिएंट हा अत्यंत वेगाने पसरत असून तो घातक असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकांना सतर्क करत धोक्याचा इशारा दिला आहे. जगभरातील सरकारांनी आता कोरोना या महाभयंकर संकटाचा अंत करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तसेच त्यासाठी नेमकं काय काय करणं गरजेचं आहे याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.
2022मध्ये कोरोना संकट संपवायचं असल्यास वेगानं करावं लागेल 'हे' काम; WHOकडून मोलाचा सल्ला
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी 2022 या वर्षात आपण कोरोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी असं म्हटलं आहे. "जागतिक स्तरावर लसीकरण लक्ष्य साध्य करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल" अशी आशा WHO प्रमुखांनी व्यक्त केली आहे. जगभरात या वर्षी तब्बल 3.3 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी साथीच्या रोगामुळे आपला जीव गमावला आहे असंही म्हटलं आहे. "ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा जास्त पटीने होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे आणि जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे" असं म्हटलं आहे