नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, दररोजच्या रुग्ण आढळण्याच्या संख्येत तब्बल ३९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख वाढला असून, गुरुवारी महाराष्ट्रात २ हजार ८१३, तर दिल्लीत ६२२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे ही कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशात गुरुवारी ९९ दिवसांनी तब्बल सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, १११ दिवसांनी पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांवर गेला आहे. देशात २४ तासांत ७,२४० नवे रुग्ण आढळले आहेत व याबरोबरच एकूण रुग्णांची संख्या ४,३१,९७,५२२ वर गेली आहे. २४ तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चौथ्या लाटेची सुरुवात? कोरोना रुग्ण वाढत असले तरी कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता अद्याप तरी दिसत नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यापूर्वी कोरोनाची लागण झाली असेल तर दुसऱ्यांदा गंभीर संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे, असे टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे डॉ. राकेश मिश्रा यांनी म्हटले आहे.
लक्षणे काय?शिंका येणे, खोकला, तीव्र ताप, थकवा, डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ. २-३ दिवसांपासून लक्षणे कायम राहिल्यास चाचणी करून घ्यावी.
रुग्ण वाढले तरी मृत्यूचा धोका नाही- राज्यात गुरुवारी २,८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर एका बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. - राज्यातील दैनंदिन रुग्णांमधील वाढ कायम असून, सक्रिय रुग्णांचा आलेखही चढता आहे. - राज्यात सध्या ११,५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात १०४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. - मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.