लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना साथीची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भीषण असण्याची शक्यता नाही असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ॲाफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एका अभ्यासातून काढला आहे. कोरोनाची दुसरी लाट निवळत असून तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच तसेच डेल्टा प्लस विषाणूचे ४८ रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष हाती आले आहेत.
आयसीएमआरने लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या सहकार्याने हा अभ्यास केला. भारतात फेब्रुवारीच्या मध्याला कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. तर पहिली लाट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात आली होती. या दोन लाटांनी आरोग्य व्यवस्थेवर ताण आला होता. तिसऱ्या लाटेमुळे आणखी हाहाकार माजू शकतो असे चित्र काही जणांकडून उभे करण्यात येत होते.आयसीएमआरने गणिती प्रारुपांच्या आधारे कोरोना साथीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्वरुपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्या अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित एक लेख इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट कोणत्या कारणांमुळे येऊ शकते याचा विचार या अभ्यासात करण्यात आला.
लसीकरण, लॉकडाऊन ठरेल प्रभावीआयसीएमआरच्या साथ व संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने राबविल्यास, तसेच लॉकडाऊनसारख्या उपायांमुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत मिळणार आहे.
देशात ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण
गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण आढळले आहेत तर ११८३ जण मरण पावले. उपचार घेणाऱ्यांचा आकडा ८६ दिवसांनंतर सहा लाखांच्या खाली घसरला आहे. आतापर्यंत ४० कोटींहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.
जगभरात १८ कोटी १२ लाख कोरोना रुग्णांपैकी १६ कोटी ५८ लाख जण बरे झाले तर १ कोटी १४ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत ३ कोटी ४४ लाखांपैकी २ कोटी ९१ लाख लोक कोरोनामुक्त झाले. तिथे ६ लाख १९ हजार लोकांचा या संसर्गाने मृत्यू झाला.
n केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ४८ हजार ६९८ नवे रुग्ण आढळले व मृत्यूंची आकडेवारी ३ लाख ९४ हजार ४९३ झाली आहे. ३ कोटी १ लाख ८३ हजार १४ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ९१ लाख ९३ हजार ८५ जण बरे झाले.n सध्या ५ लाख ९५ हजार ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ८६ दिवसांतले हे सर्वात कमी प्रमाण असून, ते एकूण रुग्णांच्या तुलनेत सहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशात दररोजचा संसर्ग दर २.७९ टक्के असून, तो सलग १९ व्या दिवशी ५ टक्क्यांच्या खाली आहे.