नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असतानाच केरळने चिंता वाढवली आहे. केरळ राज्यात गेल्या 24 तासांत 32,803 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 21,610 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, 173 रुग्णांचा मृत्यूही झालाय. केरळमुळे आता शेजारील तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी आज आढावा बैठक घेतली आहे. केंद्राने कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आरोग्य मंत्र्यांना राज्यातील कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी योग्य उपाय योजना करण्यास सांगितले आहे. केरळसह शेजारील कर्नाटक आणि तामिळनाडूच्या जिल्ह्यांमध्येही विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
लॉकडाउनमुळे कोरोना कमी होईल ?काही सरकारी सूत्रांच्या मते केरळमध्ये कडक लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावल्यानंतर सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. या कडक लॉकडाऊनशिवाय रुग्णांच्या आकडेवारीवरुन त्या-त्या जिल्ह्यात लॉकडाउन लावला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील 85 टक्के कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. परंतु या रूग्णांवर योग्य देखरेख केली जात नाही. यामुळे, प्रकरणे वाढत आहेत.
राज्य सरकार अॅक्शन मोडमध्येदरम्यान, केरळ राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी रात्रीचा कर्फ्यूसह आता राज्यात सिरो सर्व्हे सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाविरोधात लोकांची प्रतिकारशक्ती जाणून घेण्यासाठी आणि साथीच्या रोगाचा प्रसार होण्याच्या जोखमीचे आकलन करण्यासाठी सिरोप्रेव्हलन्स अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.