लखनौ : लखनौमध्ये एका यादव कुटुंबीयाचे तब्बल ८ खोल्यांचे एकेकाळी माणसांनी गजबजलेले घर मागील एक वर्षापासून ओस पडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या घरातील आठ लोकांचा २४ दिवसांत मृत्यू झाला. प्रत्येक मृत्यू व अंत्यसंस्कार सरासरी तीन दिवसांत होता. मृतांमध्ये २ बहिणी, त्यांचे ४ भाऊ, त्यांची आई व काकूचा समावेश होता. त्यातील काहीजण ऑक्सिजनसाठी खासगी रुग्णालयात तर काही घरी तडफडत होते.
सीमा सिंह यांचे ४५ वर्षीय पती निरंकार सिंह शेतकरी होते. मागील वर्षी २५ एप्रिल रोजी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते ओरडत होते, ऑक्सिजनसाठी तडफडत होते. त्यांनी मला डॉक्टरकडे जाण्यास व आणखी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मी ऑक्सिजनचा प्रवाह वाढविण्यासाठी अक्षरश: भीक मागत होते. तरीही काही होऊ शकले नाही. अखेर तडफडून त्यांचा मृत्यू झाला, असे डोळ्यांतील न थांबणारे अश्रू पुसत सीमा यादव यांनी सांगितले.
घरातील एवढ्या लोकांच्या मृत्यूनंतर एक वर्ष जगणे म्हणजे खरे तर माझाच दररोज मृत्यू झाल्यासारखे होते. एवढ्या धक्क्यानंतर १९ व २१ वर्षांच्या मुलांचे शिक्षण करणे, याची मला आणखी चिंता होती. मोठा मुलगा हैदराबादेत फॅशन डिझायनरचा तर दुसरा मुलगा बारावीचे शिक्षण घेत आहे. तो शेतातही मदत करतो. एकेक दिवस काढणे खूप अवघड आहे. मी केवळ मुलांमुळे जिवंत आहे. त्यांना मला खूप शिकवायचे आहे, अशी जिद्द त्या बाळगून आहेत.
हुंदका, आसवे अन् काळजी...भरल्या घरातून ८ सदस्य गेल्यानंतर मागील वर्ष कसे काढले, असे विचारता कुसमा देवी यांना हुंदका दाटून येतो. डोळ्यांतील आसवे पुसत पुसत त्या म्हणतात, ‘आमच्यावर जे संकट आले, ते जगात दुसऱ्या कुणावरही येऊ नये. कुणाचे गरीब होणे ठीक आहे; परंतु अशा प्रकारचे दु:ख कोणालाही मिळू नये. आता घर कसे चालवावे, मुलांचे शिक्षण कसे करावे, ही चिंता आहे.’
भविष्याची चिंता... कुसमा देवीचे ६१ वर्षीय पती विजयकुमार सिंह हेही शेतकरी व सर्वांत मोठे भाऊ होते.मागील वर्षी १ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्या आता घरातील सर्वांत मोठ्या आहेत व सर्व कारभार त्याच पाहतात. सरकारने मदत दिली असली तरी भविष्याची चिंता त्यांना सतावते आहे.