मुंबई - कोरोनामुळे गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचेही निधन झाले, तत्पूर्वी त्यांचा कोरोना अहवाला पॉझिटीव्ह आला होता. आता, तमिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध प्रोड्युसर व्ही स्वामीनाथन यांचेही निधन झाले आहे. स्वामीनाथन यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते चेन्नईतील रुग्णालयात उपचार घेत होते. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्वामीनाथन यांच्या निधनाने तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळी पसरली आहे. स्वामीनाथन यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुले अश्विन आणि अशोक आहेत. त्यापैकी, अश्विन हे तमिळ चित्रपट सृष्टीत अभिनेता आहेत. स्वामीनाथन यांचा मुलगा अश्विनने लॉकडाऊन काळातच विद्या श्री हिच्याशी लग्नगाठ बांधली. लक्ष्मी मूव्ही मेकर्स या नावाने स्वामीनाथन यांचे प्रोडक्शन हाऊस असून गेल्या 20 वर्षांपासून ते या इंडस्ट्रीचा भाग होते. तमिळ चित्रपटांचे प्रोड्युसर असण्यासोबतच त्यांनी अनेक चित्रपटात सपोर्टींग अॅक्टरची भूमिका बजावली आहे.
स्वामीनाथ यांनी आपल्या प्रोडक्शन हाऊसमधन गोकुलाथिल सीथई, प्रियामुदन, भगवती, अनबे शिवम आणि पुधुपेट्टई यांसारखे चित्रपट बनवले. या प्रोडक्शन हाऊसमध्ये त्यांच्यासमवेत के मुरलीधरन आणि जी वेणुगोपाल हेही काम करत होते.