नवी दिल्ली - देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे. ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर होत आहे. त्यातच, ट्विटवरुन सर्वाधिकपणे टीका केली जात आहे. त्यामुळे सरकारविरोधातील काही जणांचे ट्विट्स काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. सरकारच्या या आदेशानंतर अनेकांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. सत्य कसं डिलीट होऊ शकतं, असे मोईत्रा यांनी म्हटलंय.
केंद्र सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनेही काही जणांचे ट्विट डिलीट केले आहेत. त्यावरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली आहे. पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी, खासदार रेवंथ रेड्डी, अविनाश दास यांच्यासह अनेकांनी कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन केंद्र सरकारवर ट्विटवरुन टीका केली होती. त्यामुळे मोदी सरकारने ट्विटरला नोटीस बजावली. त्यानंतर भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे ट्विट असल्याने ते डिलीट केले जात असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊटवरुन दोन फोटो शेअर केले आहेत, जे सरकारच्या सांगण्यावरुन डिलीट करण्यात आले आहेत. मोईत्रा यांनी या फोटोसह प्रश्नही उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये कोणती आणि कुठे चुकीची माहिती आहे, असा प्रश्न खासदार मॅडमने विचारले आहे. तसेच, सत्य कसं डिलीट होऊ शकतं हेच पाहूया, ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, असेही मोईत्रा यांनी म्हटलंय. दरम्यान, मोदी सरकारच्या या कारवाईवर सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करत, संताप व्यक्त होत आहे.