नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून दुसऱ्या लाटेनंतर आता ओमायक्रॉनचा धोका नागरिकांवर आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन जारी केल्या असून कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे सूचवले आहे. राज्यातही गुरुवारी पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. तर, दुसरीकडे केरळ, तामिळनाडूत कोरोनाने राज्यांची चिंता वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचमुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यात एकदिवसीय लॉकडाऊनची घोषणाच केली आहे.
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला असून 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,17,532 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 491 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे केरळ सरकार सतर्क झालं असून आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी नागरिकांना तातडीचं आवाहन केलं आहे. तर, दुसरीकडे तामिळनाडू सरकारने रविवार 23 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. तमिळनाडूमध्ये आज 28,561 कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली आहे तर चेन्नईमध्ये 7,520 प्रकरणे नोंदली गेली आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेशमधील कोरोना स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यूंचे तसेच प्रकृती चिंताजनक झालेल्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. व्यापक लसीकरणामुळे हा फायदा झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. देशातील ११ राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या प्रत्येकी ५० हजारांपेक्षा अधिक आहे. देशातील प्रौढ व्यक्तींपैकी ९४ टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर ७२ टक्के जणांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यात येत आहे.
केंद्राच्या नव्या गाईडलाईनआरोग्य मंत्रालयानं लहान मुलं आणि किशोरवयीन (१८ वर्षाखालील) मुलांसाठी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची शिफारस करण्यात येत नसल्याचं आरोग्यमंत्रालयानं स्पष्ट केलंय. याशिवाय ६-११ वयोगटातील मुलं पालकांच्या थेट देखरेखीखाली सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं मास्क वापरू शकतात, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.