लखनौ - कोरोना व्हायरसच्या लढाईत उत्तर प्रदेश सरकारने यशस्वी कामगिरी केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुकाची थाप मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या पाठीवर दिली होती. योगी आदित्यनाथ यांचाही विश्वास आणि मनोबल वाढले असून 24 कोटी नागरिकांचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील कोरोना आटोक्यात आणल्याने त्यांना समाधान वाटत आहे. जागरण वृत्त समुहाच्या संपादकीय मंडळाने संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भातही त्यांनी आशावाद व्यक्त केला.
आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे या निवडणुकांमध्ये मोठ्या आव्हानांचा सामना योगी सरकार आणि भाजपला करावा लागणार आहे. मात्र, या कठीण परिस्थितीतही विधानसभा निवडणुकांच्या विजयाबद्दल योगी यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी गंगा नदीत वाहत आलेल्या मृतदेहांबद्दलही मौन सोडलं. सध्या अनेकजण अफवा पसरविण्यात आणि वातावरण दुषित करण्याचं काम करत आहेत. योगींनी काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचा गढ असलेल्या सैफई येथे भेट दिली. सैफईला भेट देणं हा योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय परिपक्वतेचा भाग होता. भेदभावविरहीत राजकारणाचा संदेश देऊन सपाच्या प्रमुखांवर टीका केली. कोरोना काळात ते होम आयसोलेशनमध्ये राहिल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री योगी यांनी अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीचा दौरा केला होता. हे विश्वविद्यापीठही देशातील महत्त्वाच्या संस्थांचाच भाग असल्याचं योगींनी म्हटलं होतं.