नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण ९३.६८ टक्के झाले आहे. कोरोनामुक्त लोकांची संख्या ८५ लाख ६२ हजार झाली असून एकूण रुग्णसंख्या ९१ लाखांवर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४६ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले, सोमवारी आणखी ५११ जण मरण पावले. आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या १,३३,७३८, एकूण रुग्णसंख्या ९१,३९,८६५ व बरे झालेल्यांचा आकडा ८५,६२,६४१ झाला. सलग तेराव्या दिवशी देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा ५ लाखांपेक्षा कमी होता. सध्या ४,४३,४८६ सक्रिय रुग्ण आहेत. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ५ कोटी ९० लाख झाली असून त्यातील ४ कोटी ७ लाख लोक बरे झाले. अमेरिकेत १ कोटी २५ लाख कोरोना रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो म्हणाले की, आशियाई देशांनी कठोर उपाय योजल्याने तिथे या रुग्णांची संख्या कमी आहे.