नवी दिल्ली : ब्रिटनमधून आता जगभरात फैलावत असलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. ब्रिटनहून भारतात परतलेल्या प्रवाशांपैकी सुमारे २० जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर एम्सच्या संचालकांनी दिलेला हा सावधानतेचा इशारा भारताच्या चिंतेत भर टाकणारा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.
ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सावधगिरी बाळगायला हवी, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, कोरोनाचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य असल्याने भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष गटाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी भारत सक्षम असून, त्या दिशेले पावले उचलली जात आहे, असेही डॉ. गुलेरिया नमूद केले.
भारतातील कोरोनाची स्थिती काहीशी दिलासादायक आहे. दररोज कोरोना लागण होणाऱ्यांमध्ये कमतरता येत आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच कोरोना मृत्यूदरही कमी झाला आहे. असे असले तरी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अधिकाधिक सावधगिरी बाळगणे सर्वांच्याच हिताचे राहील. भारतात याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ न देण्यावरच भर राहणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
दरम्यान, देशात ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. अद्यापही अनेक प्रवाशांचा शोध देशभरात सुरू असून, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे नमुने देशभरातील १० प्रयोगशाळांमध्ये तपासले जात असल्याची माहिती मिळाली आहे.