कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने जगभरात खळबळ उडविलेली असताना भारतात दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. बंगळुरूच्या विमानतळावर तपासणीवेळी दोन प्रवासी कोरोना बाधित सापडले. यामुळे बंगळुरु विमानतळावर, आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली होती.
बंगळुरुच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे रुग्ण सापडले. बेंगळुरू ग्रामीण उपायुक्त के. श्रीनिवास यांनी शनिवारी सांगितले की, या दोघांना नव्या कोरोना व्हायरसची, ओमीक्रॉनची लागण झालीय की नाही हे तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. जोवर ते नव्या व्हेरिअंटने बाधित आहेत की नाहीत हे समोर येत नाही, तोवर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवले जाणार आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
श्रीनिवास म्हणाले की, आतापर्यंत १० हाय रिस्क देशांमधून ५८४ प्रवासी बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी ९४ प्रवासी हे एकट्या द. आफ्रिकेतून आलेले आहेत. विमानतळावरील तपासणीच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी श्रीनिवास गेले होते.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या..