नवी दिल्ली: सध्या कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगासह भारताची चिंता वाढवली आहे. यातच आता नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरात जल्लोषाचे वातावरण असते. अनेक ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. पण, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी देशातील सर्व जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
एम्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदेशात डॉ. गुलेरिया म्हणाले, "नववर्षाच्या पूर्वसंध्येला मी देशातील सर्व लोकांना चांगले आरोग्य आणि समृद्ध जीवनाची प्रार्थना करतो. आपण पुढे जात आहोत, पण कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. सध्या परिस्थिती बरी आहे, पण कोरोना अद्याप गेलेला नाही. देशभरात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. पण, घाबरुन जाण्याची काही कारण नाही. फक्त सर्वांनी सतर्क राहावे लागेल'', असे गुलेरिया म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "देशात लसीकरण झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे, पण कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. म्हणूनच, आपण मास्क घालणे आणि इतर घबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. सध्या कोरोना टाळण्याचा एकमेव आणि प्रभावी मार्ग म्हणजे शारीरिक अंतर राखणे. कोरोनाचा हा प्रकार सुपर स्प्रेडर आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.''
देशात ओमायक्रॉनची 781 प्रकरणेकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये बुधवारपर्यंत 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 781 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक प्रकरणे दिल्लीत आढळून आली आहेत. येथे Omicron ची सर्वाधिक 283 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात 167 , गुजरात 73, केरळ 65, तेलंगणा 62, राजस्थान 46, कर्नाटक 34 आणि तामिळनाडूत 34 रुग्ण आहेत.