नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगात झपाट्याने वाढत आहे. जगभरात आतापर्यंत साडेसहा लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर ३० हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात देखील कोरोना व्हायरस बधित रुग्णांची संख्या एक हजारवर पोहोचली आहे. यापैकी २० लोक मरण पावले आहेत. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागरुकता करण्यात येत आहेत. त्याचवेळी अफवा देखील पसरत आहेत. या अफवांवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्टीकरण दिले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जागरुकता करण्यात येत आहे. त्यातच कोरोना व्हायरस हवेतून पसरतो अशी अफवा पसरविण्यात येत आहे. मात्र WHO ने या अफवेचे खंडण केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केली की, कोरोना व्हायरसचा प्रसार कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतरच होतो. हवेतून कोरोना व्हायरसचा प्रसार होत नाही. कोरोना व्हायरस केवळ थुंकीच्या कणांमधून परसतो. हे कण खोकला, शिंक आणि बोलताना शरीरातून बाहेर पडतात. थुंकीचे कण एवढे हलके नसतात की ते हवेतून पसरू शकतील. शरीरातून बाहेर पडल्यानंतर कोरोना व्हायरस लगेच जमिनीवर पडतात, अस WHO ने सांगितले.
कोरोनाबधित व्यक्तींच्या एक मीटर जवळ संपर्कात आल्यास कोरोना व्हायरसची बाधा दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. तसेच कोरोनाबाधित व्यक्ती कुठे थुंकला असेल किंवा शिंकला असेल त्याच ठिकाणी स्पर्श केल्यानंतर तेच हात तोंडाला किंवा डोळ्याला लावल्यास कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. त्यामुळे वारंवार आपले हात धुवावे, असं WHO ने म्हटले आहे.