नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात हाहाकार माजवला असतानाच व्हायरसच्या आणखी एका व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. ओमायक्रॉनच्या या नवीन व्हेरिएंटला BA-2 असे नाव देण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा हा सब व्हेरिएंट BA-2 मध्य प्रदेशातील इंदूरमधील 16 रुग्णांमध्ये आढळला आहे. यात 4 लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या देशभरातून 530 नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
यूके, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्कमध्ये देखील या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन सारखा वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत त्याचा संसर्ग रोखणे हे मोठे आव्हान होणार आहे. चिंतेची बाब म्हणजे हा नवीन व्हेरिएंट ओळखण्यासाठी लागणारे चाचणी किटही मुभलक प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणूनच याला 'स्टेल्थ' म्हणजेच हिडन व्हर्जन म्हटले जात आहे. ब्रिटन, स्वीडन आणि सिंगापूर या प्रत्येक देशाने 100 हून अधिक नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत.
स्टेल्थ व्हर्जन कुठे आणि कधी आढळला?
या नवीन व्हेरिएंटचे पहिले प्रकरण कुठे आढळले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्रिटिश हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 6 डिसेंबर 2021 रोजी यूकेमध्ये स्लेल्थ व्हर्जन आढळला होता. तेथे त्याच्या 426 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो. यूकेमध्ये या व्हेरिएंटला अंडर इन्व्हेस्टिगेशन श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.
BA-2 व्हेरिएंटचे लक्षण काय आहेत?
कोरोनाच्या BA-2 या नवीन प्रकाराची लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. ओमायक्रॉनसाठी ज्या जेनेटीक सोर्सला पाहिले जाते, त्यात BA-2 आढळला आहे. त्यामुळे फक्त जेनेटीक सिक्वेंसीक करुनच हा व्हेरिएंट ओळखला जाऊ शकतो. हा व्हेरिएंट ओळखण्यासाठी गेल्या वर्षी 17 नोव्हेंबरपासून 'ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंझा' अंतर्गत सर्व देशांकडून डेटा गोळा केला जात आहे. आतापर्यंत भारतासह जवळपास 40 देशांनी त्यांचा डेटा पाठवला आहे.
हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे?
कोरोनाच्या सर्व प्रकारांवर संशोधन करणाऱ्या जिनेव्हा विद्यापीठाचे संचालक फ्लॅहॉल्ट म्हणतात की, त्याचे नाव ऐकल्यानंतर घाबरू नका, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नवीन BA-2 हा ओमायक्रॉनसारखाच संसर्गजन्य आहे. मात्र, तो किती धोकादायक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.