नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या हळुहळू कमी होत आहे. पण, तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्व राज्य सरकारं सतर्क झाली आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR)ने आपल्या एका रिपोर्टचा हवाला देत देशात ऑगस्ट अखेरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
40 कोटी नागरिकांचे लसीकरण
आयसीएमआरने सांगितल्यानुसार, देशात ऑगस्ट अखेरपर्यंत दररोज एक लाख रुग्ण सापडतील. पण, कोरोनाची तिसरी लाट पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेइतकी भयावः नसेल, असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. दुसऱ्या लाटेमध्ये दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांपर्यंत पोहोचली होती. दरम्यान, देशात आतापर्यंत 40 कोटी नागरिकांना कोरोनाचा कमीत-कमी एक डोस मिळाला आहे.
वैद्यकीय उत्पादनांवर भर
दरम्यान, दुसऱ्या लाटेतून धडा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारं तिसऱ्या लाटेसाठी तयार झाले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी आधीच योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यांमध्ये कोरोना नियमांचं सक्तीनं पालन केलं जात आहे. विविध भागांमध्ये चाचण्या वाढवल्या असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे. याशिवाय, ऑक्सीजन प्लांट, बेड आणि आयसीयूच्या उत्पादनावरही भर देण्यात येतोय.