नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे भारतात आतापर्यंत ३४६ रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रात ८८, दिल्लीत ५७ रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हायरस प्रचंड वेगाने संक्रमित करत असल्याचं सांगण्यात आले आहे. परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांना जास्त काळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज भासत नाही असं दिल्लीतील LNJP रुग्णालयाचे डॉक्टर सुरेश कुमार यांनी सांगितले आहे.
दिल्लीत आतापर्यंत ओमायक्रॉनच्या ३४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील १८ जणांना उपचार करुन घरी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले सर्व रुग्ण पूर्णपणे लसीकरण झालेले होते. यातील २ रुग्ण असे आहेत ज्यांनी इंग्लंडमधून बूस्टर डोसही घेतला होता. रुग्णालयात प्रतिदिन १५-१८ संशयित रुग्णांना आणलं जातं असंही डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले.
तसेच ओमायक्रॉनचे बहुतांश संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील रुग्णांना कुठल्याही प्रकारचे गंभीर लक्षण दिसून आले नाहीत. ओमायक्रॉनच्या ९० टक्के प्रकरणांमध्ये ना कुठलीही लक्षणं आढळली ना त्यांना कुठल्याही उपचाराची गरज भासली. आम्ही अशांना आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. जेणेकरुन त्यांच्यावर देखरेख ठेवली जाईल अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.
ओमायक्रॉन झालेले १०० रुग्ण घरी परतले
देशभरात आतापर्यंत ३४६ रुग्ण आढळले असून त्यात महाराष्ट्र ८८, दिल्ली ५७, तेलंगणा २४ तसेच इतर राज्यात रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन संक्रमित १०० रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे झाल्यानंतर घरी सोडले आहे. कोरोनाच्या या नव्या संकटामुळे देशातील जनतेने सतर्क राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. त्याचसोबत केंद्रीय पथकाला कमी लसीकरण, जास्त संक्रमण, आरोग्य सुविधेची कमतरता असलेल्या राज्यांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
देशात रात्री लॉकडाऊन लावण्याचा विचार...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विधानसभेत चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात काही सदस्य विनामास्क असल्याचं दिसताच अजित पवारांनी खडसावून सांगितले की, काही जणांचा अपवाद सोडला तर अधिवेशन सुरू झाल्यापासून मी पाहतोय कोणीही मास्क लावत नाही. देशाचे पंतप्रधान हे कोरोनासंदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.