नवी दिल्ली: देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता या कोरोना संसर्गसंसद भवनातही पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेत काम करणाऱ्या किमान 400 कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 6 ते 7 जानेवारीला संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी 400 हून अधिक संसद कर्मचारी सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4 ते 8 जानेवारी दरम्यान संसदेच्या 1,409 कर्मचाऱ्यांपैकी 402 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
अनेक अधिकारी आयसोलेशनमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे 200, राज्यसभेचे 69 आणि 133 कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. या कर्मचाऱ्यांना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेले लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक अधिकारीही आयसोलेशनमध्ये आहेत.
दिल्लीत कोरोना रुग्णांमध्ये वाढ
दिल्लीत शनिवारी 20,181 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवण्यात आली. यासह 11,869 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 7 जणांचा मृत्यू झाला. यासह दिल्लीत कोरोनाचे एकूण 1,526,979 प्रकरणे आहेत. चिंताजनक म्हणजे, दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांनी वाढून 19.6 वर पोहोचला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात साप्ताहिक कर्फ्यू लागू केला आहे. तसेच सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू राहणार आहेत.