नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. त्या युवतीला सर्वसाधारण रुग्णालयातून थ्रिसूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शुक्रवारी उपचारांसाठी हलविण्यात आले आहे.ही युवती चीनमधील वुहान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तेथून ती नुकतीच केरळमध्ये परतल्यानंतर तिची प्रकृती बिघडली होती. त्यावरील उपचारांसाठी तिला सर्वसाधारण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले होते.
तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे रक्ततपासणीत आढळून आले. त्यानंतर केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. कोरोनाग्रस्त युवतीला शुक्रवारी शासकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय या बैठकीतच घेण्यात आला. कोरोनाचा संसर्ग झालेल्या २४ रुग्णांवर एकाच वेळी उपचार करता येतील, असा स्वतंत्र कक्ष या रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. केरळमध्ये १,०५३ लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या सहा जणांवर दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. त्यांच्या रक्ततपासणीचे अहवाल लवकरच हाती येतील, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. त्यातील पाच जण स्वत:हून गुरुवारी या रुग्णालयात दाखल झाले आहेत. या पाच जणांपैकी एक महिला असून ती २०१५ पासून चीनमध्ये राहत आहे. ती २९ जानेवारी रोजी भारतात परतली. तिच्याशिवाय अन्य चार पुरुष रुग्ण आहेत.
या पाच रुग्णांव्यतिरिक्त आणखी एक रुग्ण ३२ वर्षांचा असून तो ४ ते ११ जानेवारी या कालावधीत चीनमध्ये गेला होता. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग, परराष्ट्र खाते, गृहखाते, नागरी हवाई वाहतूक खाते, माहिती-प्रसारण खाते, कामगार व रोजगार खाते आदी खात्यांच्या अधिकाºयांची गुरुवारी बैठक घेतली.लष्कराचा वैद्यकीय कक्ष- इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या (आयटीबीपी) वतीने दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ६०० खाटांची सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष उघडला जाणार आहे. तिथे डॉक्टरांचे पथकही अहोरात्र सज्ज असेल.- चीनच्या हुबेई प्रांत व वुहान शहरातून विशेष विमानाने परत येणाºया ३०० विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी दिल्लीतील मनेसर येथे ३०० खाटांची सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष भारतीय लष्कराकडून सुरू करण्यात येणार आहे.