मुंबई : कोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशभरातील ५८ टक्के महिला डॉक्टरांनी टेलिमेडिसीनचा पर्याय स्वीकारला आहे. याशिवाय, तरुण वयातील ५० टक्के डॉक्टरांनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शविली आहे. यात प्रकर्षाने पुरुष डॉक्टरांपेक्षा महिला डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे.उपचारांचा विलंब टाळून संपर्करहित आरोग्यसेवेचा हा पर्याय रुग्णांमध्येही आता रुजत असल्याचे या अभ्यास अहवालातून दिसून आले आहे. नुकताच अमेरिकेतील परड्यू विद्यापीठ आणि स्ट्रेटजिक मार्केटिंग सोल्यूशन्स अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील डॉक्टरांचा अभ्यास करण्यात आला आहे.या अहवालानुसार, ४४ टक्के पुरुष डॉक्टरांनी टेलिमेडिसीनची सेवा सुरू केली आहे. देशातील ८० शहरांतील २ हजार ११६ डॉक्टरांशी संवाद साधून याविषयी अभ्यास करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणात फिजिकल क्लिनिक्स आॅनलाइन कन्सल्टेशनमध्ये रूपांतर झाले आहे.या अहवालानुसार, प्रॅक्टीस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ११ टक्के डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला दिला आहे. तर ८२ टक्के डॉक्टर फोनच्या माध्यमातून ही सेवा देत आहेत. दक्षिणेतील ६२ टक्के डॉक्टरांनी टेलिमेडिसीन सर्वाधिक स्वीकारले आहे. तर उत्तरेला हे प्रमाण ५० टक्के आणि पश्चिमेला ५२ टक्के आहे. पूर्वेकडे हे प्रमाण सर्वांत कमी असून केवळ ३० टक्के एवढे आहे. रुग्णांनीही आॅनलाइनच्या माध्यमातून समाधानकारक सेवा मिळत असल्याचे या अहवालात नमूद आहे.
CoronaVirus News: कोरोना काळात ५८ टक्के महिला डॉक्टरांनी स्वीकारला टेलिमेडिसीनचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 3:46 AM