भोपाळ - देशातील 8 राज्यात राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. त्यानुसार, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगतदार लढाई आहे. मध्य प्रदेशमध्ये तीन जागांवर निवडणूक होत असून भाजपा-काँग्रेस उमेदवारांसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच, काँग्रेसच्या एका मतदाराने चक्क पीपीई कीट परिधान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला. या आमदारांनी विधानसभेत एंट्री करताच, तेथील इतर उपस्थितांनी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी धावाधाव केल्याचं दिसून आलं.
कोरोनाच्या महामारीमुळे यापूर्वी 18 जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर कर्नाटकमधील 4 आणि मिझोरममधील व अरुणाचल प्रदेशच्या 1-1 जागेसह एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. राज्यसभेच्या 19 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. सध्या मणिपूरमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, सत्ताधआरी आघाडीतील 9 सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, तेथील एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथून भाजपाने लीसेम्बा सानाजाओबा तर काँग्रेसने टी मंगी बाबू यांना उमेदवारी दिली आहे. कोरोनाच्या सावटाखाली पार पडत असलेल्या या निवडणुकीत कोरोनाचा फिवर पाहायला मिळाला.
राज्यसभा निवडणुकांच्या मतदानासाठी एका कोरोना पॉझिटीव्ह मतदाराने उपस्थिती दर्शवली. मध्य प्रदेशचे काँग्रेस आमदार शुक्रवारी दुपारी राज्यसभेच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर चक्क पीपीई कीट परिधान करुन आले होते. मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी आज सकाळपासूनच भाजपा आणि काँग्रेसचे आमदार व मतदार आपलं मतदान करत आहेत. मात्र, दुपारी एक वेगळच चित्र पाहायला मिळालं. काँग्रेस आमदार कुणाल चौधरी हे पीपीई कीट परिधान करुन विधानसभेत पोहोचले. कारण, काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार कुणाल चौधरी यांनी मतदान केल्यानंतर, संबंधित परिसर पूर्णपणे सॅनिटायझ करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव इतर पसरू नये, यासाठी सर्व ती काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील 4 जागेवर माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपा उमेदवार इरन्ना काडादी आणि अशोक गस्ती हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, अरुणाचल प्रदेशमध्येही भाजपा उमेदवार नबाम रेबिया यांनी बनविरोध विजय मिळवत भाजपाची सीट काबिज केली आहे. आज सायंकाळीच या सर्व 19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी व पराजीत जागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व प्रत्येक उमेदवार आणि मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने तशी खबरदारी घेतली आहे.