Coronavirus: दिल्लीत कोरोना प्रादुर्भावाची इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे की ब्लॅक कॅट कमांडो म्हणजेच NSGच्या ग्रूप कमांडरला देखील बेड मिळू शकला नाही आणि रस्त्यातच त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NSG ग्रूप कमांडर वीरेंद्र कुमार झा यांना दिल्लीत आयसीयू बेड मिळाला नाही. वीरेंद्र कुमार २२ एप्रिल रोजी अर्धसैनिक दलाच्या रेफरल हॉस्पीटलमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची परिस्थिती ठीक होती. पण ४ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता अचानक वीरेंद्र कुमार झा यांची तब्येत बिघडली आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी खूप कमी होऊ लागली. (corona positive nsg group commander death due to not even found icu bed)
नोएडाच्या रेफरल हॉस्पीटलमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नसल्यामुळे तात्काळ दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दिल्लीतील अनेक हॉस्पीटल्समध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. सुत्रांच्या माहितीनुसार एनएसजी कमांडर वीरेंद्र झा यांना आयसीयू बेड मिळविण्यासाठीच ५ तासांचा कालावधी गेला. या दरम्यान त्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड होत गेला.
वीरेंद्र झा यांना आयसीयू बेड मिळावा यासाठी सुरुवातीला रात्री ११ वाजता सुखदेव बिहार येथे नेण्यात आलं. पण तिथंही बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर दिल्लीच्या अॅस्कॉर्ट फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यादरम्यान त्यांची प्रकृती इतकी बिघडली की रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच वीरेंद्र झा यांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीत सध्या कोरोना रुग्णांना हॉस्पीटलमध्ये बेड मिळणं फार कठीण होऊन बसलं आहे. एक आयसीयू बेड उपलब्ध होऊ न शकल्यानं देशानं एक एनएसजी कमांडर गमावला. यावरुन दिल्लीतील भयानक परिस्थितीची कल्पना येते.