नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने हाहाकार माजल्याने कोरोनावर लस कोण पहिल्यांदा विकसीत करते, याची जगात स्पर्धा सुरू होती. त्यात, रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतीन यांनी लस तयार झाल्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर ती लस आपल्या मुलीलाही देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जगातील ही पहिली कोरोना लस आहे असा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. देशात आत्तापर्यंत १६,३९,६०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे, कोरोना बरा होत असल्याचं दिसून येतंय.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज ५० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी देशात ६०,९६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ८३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या २४ तासांत वाढलेल्या ६०,९६३ रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३,२९,६३९ एवढी झाली आहे. त्यामध्ये, अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 6,43,948 एवढी असून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा तब्बल 16,39,600 इतका आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असल्याचे दिसून येते. एकीकडे कोरोनावर मात करण्यात रुग्ण यशस्वी होत असून दुसरीकडे कोरोनावरील जगातील पहिली लस निघाल्याची घोषणा रशियाने केली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
रशियाने बनवलेल्या या लसीचे नाव ‘स्पुटनिक व्ही’ असे नाव दिले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. या लसीच्या विकासासाठी आर्थिक मदत करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव्ह यांनी सांगितले की, या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी बुधवारी सुरू करण्यात आली आहे. या लसीचा प्रभाव दोन वर्ष राहतो असा दावा, रशियाच्या आरोग्य खात्यानं केला आहे. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ही नोंदणी सशर्त करण्यात आली आहे. या लसीचे उत्पादन सुरू असताना त्याच्या चाचण्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, दुसरीकडे राज्यात दिवसभरात ११ हजार ८८ आणि २५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ झाली असून बळींचा आकडा १८ हजार ३०६ झाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात मंगळवारी ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ सक्रिय रुग्ण आहेत. १०, ०१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के एवढा आहे.