नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुुरुवारी दुपारी शेखावत यांनीच ही माहिती दिली आहे. शेखावत हे कोरोनाची बाधा झालेले सहावे केंद्रीय मंत्री ठरले आहेत. शेखावत यांना गुरगाव येथील मेदांता रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.या महिन्याच्या प्रारंभी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याशिवाय केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. आता केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचाही त्यात समावेश झाला आहे. काही केंद्रीय मंत्र्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्क घालण्याचे बंधन न पाळल्याची चर्चा आहे. मंत्रीच जर असे वर्तन करणार असतील, तर जनतेने कुणाचा आदर्श ठेवायचा, अशीही विचारणा होत आहे.गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले आहे. त्यांनी या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोरोना संसर्गासारखी लक्षणे जाणवू लागताच मी वैद्यकीय चाचणी केली. त्यात या आजाराची मला बाधा झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. सर्वांनीच आपापल्या प्रकृतीची काळजी घ्यावी व सतर्क राहावे, असेही शेखावत यांनी म्हटले आहे. सतलज, यमुना नद्या जोडणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची मंगळवारी भेट घेतली होती.
कोरोना झालेले शेखावत सहावे केंद्रीय मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 5:02 AM