नोएडा – देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आता समोर येत आहे. कोरोना संकट काळात रुग्णांना मिळालेल्या बेजबाबदार वागणुकीमुळे काही जणांचे मृत्यू झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अलीकडेच उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी या ८ महिन्याच्या गर्भवती महिलेला अनेक हॉस्पिटलचे दार ठोठवावे लागले.
या गर्भवती महिलेमध्ये कोरोनाचे लक्षण दिसत असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले नाही. १३ तास ही ८ महिन्याची गर्भवती महिला रुग्णवाहिकेतून एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फेऱ्या भरकटत राहिली. अखेर वेळेवर उपचार न मिळाल्याने वाटेतच तिने प्राण सोडले. त्यासोबत तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाचाही मृत्यू झाला. या प्रकरणी नोएडाच्या डीएम सुहास एल वाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गाझियाबादच्या खोडा कॉलनीमधील नीलम कुमारी ८ महिन्याची गर्भवती होती. प्रसुती वेदना होत असल्याने तिला शुक्रवारी सकाळी ६ च्या रिक्षाने हॉस्पिटलला नेण्यात आले. नीलमचे पती बृजेंद्र एका मीडिया कंपनीत मेन्टेन्स विभागात काम करतात. त्यांचे भाऊ शैलेंद्र कुमार रिक्षा ड्रायव्हर आहेत. शैलेंद्र आणि त्यांच्या पत्नीने नीलम यांना नोएडातील सेक्टर २४ मधील ईएसआयसी हॉस्पिटलला घेऊन गेले.
नीलम एका वायर मॅन्युफॅक्चरिंग विभागात काम करते, त्यांच्याकडे ईएसआय कार्डही होते, ईएसआयसी हॉस्पिटलने काही वेळ नीलमला ऑक्सिजनवर ठेऊन नंतर सेक्टर ३० मधील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्याठिकाणी स्टाफने त्यांना दाखल करुन घेतले नाही. खोडा कॉलनी कन्टेंन्मेंट झोनमध्ये येत असल्याने स्टाफने नीलमला दाखल करुन घेतलं नाही असा आरोप तिच्या पतीने केला. त्यानंतर शिवालिक हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाण्यात आले. त्याठिकाणीही दाखल करुन न घेता दुसऱ्या चांगल्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सकाळी ११ च्या सुमारास तिला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले तिथेही अशाचप्रकारे वागणूक देण्यात आली.
स्टाफने त्यांच्याकडे बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत असं सांगितले. पुन्हा कुटुंबाने नीलमला जेपी रुग्णालयात आणलं तिथेही तिला दाखल करुन घेतले नाही. नीलममध्ये कोविड १९ ची लक्षणं असल्याने तिला शारदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. पण त्याठिकाणीही नीलमला दाखल करुन घेतले नाही. शारदा हॉस्पिटलशेजारी जिम्स हॉस्पिटलमध्ये नीलमची कोरोना टेस्ट केली, त्यासाठी रुग्णालयाने ४ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर बेड खाली नाही असं सांगून जिम्स हॉस्पिटलनेही उपचारास नकार दिला. १०८ ला फोन करुन एम्ब्युलन्स मागवली पण ती आली नसल्याने आम्ही ५ हजार ८०० रुपये देऊन खासगी रुग्णवाहिका बोलावली असं तिच्या पतीने सांगितले.
इतक्या हॉस्पिटलने उपचारास नकार दिल्यानंतरही कुटुंबाने आशा सोडली नाही, गाझियाबाद येथील वैशाली स्थित मॅक्स हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं. पण तिथेही जिम्समध्ये जाण्याचा सल्ला दिला, पण जिम्समध्ये पुन्हा नेल्यानंतर त्याठिकाणी एम्ब्युलन्समध्येच नीलमचा मृत्यू झाला. तिने प्रतिसाद देणं सोडलं तेव्हा आम्ही रुग्णालय प्रशासनाला चेक करण्यास सांगितले त्यानंतर साडे सात वाजता तिला मृत घोषित करण्यात आले. आमच्यासोबत जे झालं ते दुसऱ्या कोणासोबत होऊ नये असं सांगत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं नीलमच्या पतीने सांगितले.
दिवसभर रुग्णवाहिकेतच फिरत राहिली
सकाळी ६ वाजता - ईएसआयसी हॉस्पिटल, सेक्टर २४
सकाळी ९ वाजता - जिल्हा रुग्णालय, सेक्टर ३०
सकाळी १० - शिवालिक हॉस्पिटल, सेक्टर ५१
११ वाजता- फोर्टिस हॉस्पिटल, सेक्टर ६२
दुपारी १.३० - जेपी हॉस्पिटल, सेक्टर १२८
दुपारी २.३०- शारदा हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा
३.३० दुपारी- जिम्स हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा
सायंकाळी ५.३० वाजता- मॅक्स हॉस्पिटल, वैशाली
संध्याकाळी ७ – पुन्हा जिम्स हॉस्पिटलला पोहचले
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा
...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप
जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!