नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत केंद्र सरकारला कोरोनाचा सामना करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. तसेच, सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने रणनीती तयार करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, की सर्व राजकीय पक्षांच्या सल्ल्याने कोरोनाचा सामना करण्यासंदर्भात रणनीती तयार करायला हवी. काँग्रेस पक्ष देशाला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णयांत साथ देईल. (Corona testing oxygen medicine hospitals should be managed says congress president Sonia Gandhi)
सोनिया गांधी म्हणाल्या, सद्यस्थिती मानवतेसाठी धक्कादायक आहे. कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे औषधांचा तुटवडा तर अनेक रुग्णालयांत बेड्स नाहीत. याशिवाय, ही परीक्षेची वेळ आहे, एकमेकांना मदद करा. आवश्यकता असेल तेव्हाच घरातून बाहेर पडा, असे आवाहनही सोनिया गांधी यांनी जनतेला केले आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या, 'ही सरकारांनी जागे होण्याची आणि कर्तव्य पालन करण्याची वेळ आहे. केंद्र सरकारने गरिबांच्या बाबतीत विचार करावा आणि पलायन रोखण्यासाठी हे संकट संपेपर्यंत त्यांच्या खात्यात 6 हजार रुपये टाकावेत, कोरोना टेस्टिंग वाढवायला हवी, ऑक्सिजन, औषधी आणि रुग्णालयांचे युद्धस्तरावर व्यवस्थापन करायला हवे, मोफत लसीकरणाची व्यवस्था व्हायला हवी, कोरोना लशीतील किंमतीतील फरक संपायला हवा, जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार बंद व्हायला हवा, मेडिकल ऑक्सिजन रुग्णालयांना देण्याची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी,' असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
भारतात एकाच दिवसात 4 लाख 1 हजार 993 नव्या कोरोना रुग्ण -मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4 लाख 1 हजार 993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 99 हजार 988 इतकी आहे.
Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल
एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजारच्या वर -देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 11 हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात 32 लाख 68 हजार 710 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.