देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. देशामध्ये १८ हजारांच्या आसपास कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मेट्रो शहरांमध्ये दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. येथे दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून महाराष्ट्रामध्ये रुग्णालयात मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावेळचा कोरोनाच्या व्हेरिएंट थोडा वेगळा आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट तर येणार नाही ना? पुन्हा एकदा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण तर होणार नाही ना? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
दिल्लीतील एम्सचे माजी संचालक महेशचंद्र मिश्र यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत सांगितले की, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांची संख्या वाढणंही शक्यही आहे. कोरोना विषाणूबाबत बऱ्याच काळापासून तो संपुष्टात आलेला नाही, असं सांगितलं जातंय. तो आपल्या आसपासच आहे. कारण व्हायरस हा वारंवार म्युटेट होत राहतो, जिवंत राहण्यासाठी आपलं स्वरूप बदलत राहतो. तसेच कोरोना व्हायरस करत आहे. या म्युटेशनमधून कधीकधी एखादा व्हायरस धोकादायक बनतो. तर अनेकदा हा व्हायरस फार प्रभावित न करता निघून जातो.
पुन्हा एकदा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणार का, असं विचारलं असता, डॉ. मिश्रा म्हणाले की, कोरोनापासून धोका आहे का, ह प्रश्न असेल तर कोरोना आता लोकांना आजारी पाडत राहील, हे समजून घ्या. तो व्हायरल आणि फ्लू प्रमाणे लोकांना संक्रमित करत राहील. मात्र ज्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहता २०२० किंवा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणे शक्य नाही. त्यावेळी दोन गोष्टी नव्हत्या. पहिली म्हणजे कोरोनावरील लस आणि संसर्गापासून बनलेली इम्युनिटी. त्यामुळे त्यावेळी कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केलं होतं. मात्र आताच्या काळाबाबत बोलायचं झाल्यास कोरोनाच्या साथीचा तो काळ परत येण्याची शक्यता नाही आहे.
डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, कोरोनापासून रक्षण करण्यासाठी आज लोकांच्या शरीरामध्ये व्हॅक्सिनपासून बनलेली इम्युनिटी आणि संसर्गापासून बनलेली इम्युनिटी अशा दोन्हीही आहेत. अशा परिस्थितीत कोरोनामुळे गंभीर धोका निर्माण होईल, असं वाटत नाही. असं असलं तरी कोरोना बाधित करू शकतो. त्याच्यापासून बचावासाठी मास्क वापरणं अनिवार्य करण्याचा आदेश किंवा दंडाची घोषणा करणे आवश्यक नाही. लोकांनीच तो अनिवार्य समजून वापरला पाहिजे.