रशियासारख्या देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले असून दररोज 40 हजारावर रुग्ण आणि 1000 च्या आसपास मृत्यू होत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) परिस्थिती बिकट आहे. चीनमध्ये काही शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. अशावेळी भारत देखील तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे.
देशात सध्या सारे काही सुरु झालेले आहे. नवरात्री, दसरा, छट पूजा, दिवाळी आदी सण आले आहेत. यामुळे बाजारात देखील गर्दी पहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी सण साजरे करताना कोरोनाचे नियम पाळणे, गर्दी न करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तरीही मुंबई, पुण्यासह अनेक शहरे, ग्रामीण भागात मास्क काढून लोक फिरत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचा नवा AY.4.2 व्हेरिअंट पोहोचला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर आणि तेलंगानामध्ये हा नवा व्हेरिअंट सापडला आहे. तज्ज्ञांनुसार या नव्या व्हेरिअंटवर अद्याप संशोधन सुरु आहे. हा नवा व्हेरिअंट डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या समुहातील आहे. बुधवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. टेस्टिंग वाढविले तर ही आणखी रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बुधवारी 1482 नवे कोरोनाबाधित सापडले. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर देशात गेल्या 24 तासांत 16,156 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत व 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1,60,989 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काही ठिकाणी पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. पश्चिम बंगाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण 24 परगाना जिल्ह्याच्या सोनारपूर नगर पालिका क्षेत्रात तीन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.