मुंबई: देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे देशवासीयांची चिंता वाढली आहे. तिसरी लाट कधी ओसरणार आणि दिलासा कधी मिळणार असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. याबद्दल आयआयटी मद्रासनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
कोरोनाची तिसरी लाट पुढील दोन आठवड्यांत टोक गाठेल. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा दर म्हणजेच आर व्हॅल्यू १४ ते २१ जानेवारीदरम्यान १.५७ होता. म्हणजेच दोन व्यक्तींच्या माध्यमातून तीन जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. हा दर येत्या काही दिवसांत आणखी खाली जाईल, असं आयआयटी मद्रासचा अहवाल सांगतो. एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किती जणांना कोरोना बाधित करू शकते, त्या दराला आर व्हॅल्यू म्हटलं जातं. हा दर १ च्या खाली गेल्यास महामारीची स्थिती संपल्याचं समजतात.
आयआयटी मद्रासच्या अहवालानुसार, १४ ते २१ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू १.५७ होती. ७ ते १३ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू २.२ आणि त्याआधी १ ते ६ जानेवारी दरम्यान २.९ होती. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांत कोरोना प्रादुर्भावाचा दर कमी होताना दिसत आहे. पुढील १४ दिवसांत तिसरी लाट ओसरेल असा अंदाज आयआयटी मद्रासकडून व्यक्त करण्यात आला आहे.
आयआयटी मद्रासच्या आकडेवारीतून मुंबई, कोलकात्याची स्थिती चांगली असल्याचं समोर आलं. मुंबईतील आर व्हॅल्यू ०.६७, कोलकात्याची आर व्हॅल्यू ०.५६ आहे. त्यामुळे या शहरातील कोरोनाची लाट ओसरल्याचं समजतं. दिल्ली, चेन्नईची आर व्हॅल्यू अद्यापही १ च्या जवळ आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे ३ लाख ६ हजार ६४ कोरोना रुग्ण आढळून आले. परवा हाच आकडा सव्वा तीन लाखांच्या पुढे होता.