नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. त्यामुळेच आता देशात कोरोनाची तिसरी लाट कमकुवत होत असल्याचे मानले जात आहे. कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, 34 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. तसेच, पॉझिटिव्हिटी रेटही खाली आला आहे. मात्र, केरळ आणि मिझोराममध्ये कोरोना प्रकरणे आणि पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, आतापर्यंत सुमारे 167.88 कोटी लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 18 वर्षावरील वयोगटातील 96% लोकसंख्येला पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 76% लोकांना दुसरा दोन डोस दिले आहेत. याशिवाय, 15-18 वयोगटातील लोकसंख्येच्या 65% लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. यासोबतच सरकारकडून असेही सांगण्यात आले आहे की, 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 टक्के लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 4 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा आकडा 96 ते 99 टक्के आहे.
केरळमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत 1,72,433 कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. 8 राज्यांमध्ये 50 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत, तर 12 राज्यांमध्ये 10-50 हजार सक्रिय प्रकरणे आहेत. केरळ हे एकमेव राज्य आहे जिथे सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.