नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच 'एम्स' रुग्णालयात आज (सोमवारी) हलवण्यात आले. मुख्यमंत्री रावत यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे देहरादून येथील दून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे पुढील उपचारांसाठी रावत यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री रावत यांना १८ डिसेंबर रोजी कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रावत होम क्वारंटाइन झाले होते. परंतु, तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे रावत यांना दून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दून रुग्णालयात उपचार घेत असताना रावत यांच्या फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील उपचारांसाठी रावत यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रावत यांची प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. मात्र, काल (रविवारी) रात्री फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे काही तपासण्यांनंतर निष्पन्न झाले. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री रावत यांना दिल्लीत हलवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रावत यांच्या पत्नी आणि मुलीलाही कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात एकूण २० हजार ०२१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून, २७९ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी ०२ लाख ०७ हजार ८७१ झाली असून, ९७.८२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.