कोरोना महामारी विरोधातील लढ्यात भारत लवकरच एक मोठं यश प्राप्त करणार आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यातील सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजेच लसीकरणाच्या मोहिमेत भारत लवकरच १०० कोटींचा आकडा गाठणार आहे. याच खास क्षणाचं जोरदार सेलिब्रेशन करण्याची तयारी आता केंद्र सरकारनं केली आहे. लसीकरण मोहिमेसाठीचं एक खास गाणं तयार करण्यात आलं आहे. देशानं कोरोना लसीकरण मोहिमेत १०० कोटी डोसचा पल्ला गाठल्यानंतर संपूर्ण देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर जसं की रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, विमानतळ, बस स्थानकांवर लसीकरणासाठीचं तयार करण्यात आलेलं खास गाणं ऐकायला मिळणार आहे.
गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं असून 'टीके से बचा है देश टीके से', असे गाण्याचे बोल आहेत. देशातील कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं आहे. पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या तेल आणि गॅस कंपन्यांनी मिळून या गाण्याची निर्मिती केली आहे. येत्या सोमवारी देश कोरोना विरोधी लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ९७ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वैज्ञानिकांवर विश्वास दाखवला आणि भारतानं तयार केलेल्या लसीचा देशवासियांना खूप उपयोग झाला. आपल्याला इतर देशांवर लसीसाठी अवलंबून राहावं लागलं नाही. येत्या काही दिवसात आपण १०० कोटी लसीकरणाचा आकडा गाठू असा विश्वास आहे.
१०० कोटी डोसचा आकडा गाठल्यानंतर कैलाश खेर यांच्या आवाजात संगितबद्ध करण्यात आलेलं खास गाणं लाँच केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे गाणं देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणी ऐकायला मिळेल. देशातील लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्याचा यामागचं उद्देश आहे, असंही ते म्हणाले.