मध्यप्रदेशातील सागर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे गेल्या बुधवारी लस टोचानाऱ्या जितेंद्र नावाच्या एका व्यक्तीने तब्बल 30 विद्यार्थ्यांना एकाच सिरिंजने लस टोचल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात बोलताना, अधिकाऱ्यांनी केवळ एकच सिरिंज पाठवली होती आणि विभागप्रमुखांनी सर्व मुलांना हिच्या सहाय्याने लसिकरण करण्याचे आदेश दिले होते, असा दावा लसीकरण करणाऱ्या जितेंद्र ने केला. याच बरोबर, आपल्याला त्या अधिकाऱ्याचे नाव माहीत नाही, असेही जितेंद्रने विद्यार्थ्यांच्या पालकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
एकाच सिरिंजने 30 विद्यार्थ्यांना टोचण्यात आली लस -डिस्पोजेबल सिरिंज, जी केवळ एकदाच वापरली जाते. 1990 च्या दशकापासूनच एचआयव्ही पसरल्यानंतर, डिस्पोजेबल सिरिंज वापरायला सुरुवात झाली आहे. मात्र, संबंधित व्हिडिओमध्ये, 'ज्या व्यक्तीने साहित्य वितरित केले, त्याने केवळ एकच सिरिंज दिली,' असे जितेंद्र बोलत असताना दिसत आहे.
घटनेनंतर चौकशीला सुरुवात - एका पेक्षा अधिक लोकांना इंजेक्शन देताना एकाच सिरिंजचा वापर करू नये, हे आपल्याला माहीत आहे? असे विचारले असता, जितेंद्र म्हणाला, "'हो' मला माहीत आहे. यामुळेच तर मी त्यांना विचारले, की मला केवळ एकाच सिरिंजचा वापर करायचा आहे? यावर ते म्हणाले 'हो'. मग ही माझी चूक कशी? मी तेच केले जे मला सांगण्यात आले होते." यानंतर, सागर जिल्हा प्रशासनाकडून जितेंद्रविरुद्ध हलगर्जीपणा आणि केंद्राच्या 'वन निडल, वन सिरिंज, वन टाईम' नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोना लसीकरण शिबिरादरम्यान घडली घटना -याप्रकरणी लसी आणि इतर काही आवश्यक सामग्री पाठवणाऱ्या प्रभारी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. राकेश रोशन यांच्या विरोधातही विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही घटना सागर शहरातील जैन पब्लिक हायर सेकेंडरी स्कूलमध्ये मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कोरोना लसीकरण शिबिरात घडली. याप्रकरणी प्रभारी कलेक्टर क्षितिज सिंघल यांनी तत्काळ, मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले. चौकशीदरम्यान जितेंद्र उपस्थित नव्हता. तसेच, घटना समो आल्यानंतर त्याचा फोनही स्वीच ऑफ होता, असे सूत्रांनी म्हटले आहे.