नवी दिल्ली : युराेपमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, फ्रान्ससह काही देशांमध्ये लाॅकडाऊन लागले आहे. त्यामुळे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून ‘ॲस्ट्राझेनेका’ने विकसित केलेल्या लसीचे १० काेटी डाेस विकत घेण्यास परवानगी देण्याची विनंती युराेपियन समुदायाने केंद्र सरकारकडे केली आहे. भारतात काेराेनाच्या लसींचे सर्वाधिक उत्पादन हाेत आहे. त्यात ‘सीरम’ आघाडीवर आहे. मात्र, सर्वप्रथम देशाची गरज पूर्ण करणार आणि त्यानंतरच निर्यात करणार अशी भूमिका कंपनीने यापूर्वीच जाहीर केली आहे. मात्र, पाश्चिमात्य देशांमध्ये काेराेनाच्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत युराेपमध्ये लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीसाठी युराेपियन देशांचे डाेळे भारताकडे लागले आहेत. लसविक्रीसाठी परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारवर युराेपियन समुदायाकडून दबावही वाढलेला दिसत आहे, तसेच ब्रिटनने ‘सीरम’ला १ काेटी लसींची ऑर्डर दिली हाेती. त्यापैकी उर्वरित ५० लाख लसींचा पुरवठा करावा, यासाठी ब्रिटनकडून दबाव वाढत आहे. युराेपियन समुदायाची मागणी भारताकडून मान्य हाेण्याची शक्यता कमीच आहे. दिल्लीत २४ तासांमध्ये ५६ हजारांवर लोकांनी घेतली लस१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दिल्लीत तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकांनी प्रचंड उत्साह दाखवला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ५६ हजार ५३१ जणांना लस देण्यात आली, तर शुक्रवारीही लसीकरणासाठी गर्दी होती. ...म्हणून ‘सीरम’कडे मागणीॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे भारतात ‘सीरम’तर्फे उत्पादन करण्यात येत आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या युराेपियन कारखान्यांमधून अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन हाेत आहे. त्यामुळे ‘सीरम’कडून लसीची मागणी करण्यात येत आहे. युराेपियन समुदायाच्या राजदूतांनी दाेन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारला विनंतीचे पत्र पाठविले हाेते. याबाबत ‘सीरम’, तसेच केंद्र सरकारकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.
corona vaccination : ‘सीरम’कडून लस विकत घेण्यास परवानगी द्या, युराेपियन समुदायाचे केंद्राकडे आर्जव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:29 AM