डेहराडून : कोरोना लस तसेच अॅलोपथीला जोरदार विरोध करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या मूळ भूमिकेपासून घुमजाव करून आता कोरोना लस घेण्याची तयारी दाखविली आहे. डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत आहेत, असेही उद्गार बाबा रामदेव यांनी काढून सर्वांना धक्का दिला आहे.कोरोनावरील उपचारांमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मरण पावलेल्यांपेक्षा अॅलोपॅथीच्या औषधांनीच लाखो लोकांचा जीव गेला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले होते. त्यामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अॅलोपॅथी डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता. या सर्व घटनांनंतर आता बाबा रामदेव यांनी चक्क कोरोना लस घेण्याची तयारी दाखविली आहे. २१ जूनपासून सर्वांना मोफत कोरोना लस देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचेही त्यांनी स्वागत केले आहे. हे ऐतिहासिक पाऊल असून सर्वांनी लस टोचून घ्यावी, असेही आवाहन योगगुरूंनी केले आहे.हरिद्वार येथे पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, कोरोनाची लसही घ्या व योग, आयुर्वेदाच्या साहाय्यानेही प्रकृती उत्तम राखा. या दुहेरी कवचामुळे प्रत्येकाचे कोरोनापासून संरक्षण होईल व एकाचाही या आजाराने मृत्यू होणार नाही. मीही लवकरच कोरोना लस घेणार आहे. (वृत्तसंस्था)
Corona Vaccination : बाबा रामदेव आता कोरोना लस घेण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 6:16 AM