नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असनाता दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने देशातील आरोग्य क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December - for India and for Indians)
देशातील कोरोनास्थितीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भारत आणि भारतीयांसाठी २१६ कोटी लसींचे उत्पादन करण्यात येईल. त्यामुळे कोरोनावरील लस ही सर्वांसाठी उपलब्ध होईल यात शंका नाही, असा विश्वासही व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत भारतात जवळपास १८ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत २६ कोटी डोस देण्यात आले आहेत. तर या क्रमवारीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. दरम्यान, रशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही लस भारतात आली आहे. आता ही लस पुढील आठवड्यापासून बाजारांमध्ये उपलब्ध होईल. रशियातून मर्यादित स्वरूपात आलेला ही लस पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होईल, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. दरम्यान, स्पुटनिक या लसीचे जुलै महिन्यापासून भारतात उत्पादन होईल, अशी माहितीही समोर आली आहे.