नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घसरण सुरू आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशात लवकरच चौथी लस उपलब्ध होणार आहे. भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) मॉडर्ना लसीच्या आयातीला मंजुरी मिळाली आहे.
डीसीजीआयनं सिप्ला कंपनीला मॉडर्ना लस आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळू शकते, अशी माहिती एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. सध्या देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसींचा वापर सुरू आहे. त्यातील स्पुटनिक व्ही रशियन आहे. तर इतर दोन लसींचं उत्पादन भारतात होत आहे. मॉडर्नाच्या आपत्कालीन वापरास लवकरच परवानगी अपेक्षित आहे. तसं झाल्यास ती देशातील चौथी लस ठरेल.
मॉडर्ना लस किती प्रभावी?कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट समोर येत असताना आणि त्यामुळे चिंतेत भर पडत असताना मॉडर्ना लसीबद्दल सकारात्मक माहिती पुढे आली आहे. mRNA तंत्रावर आधारित मॉडर्ना लस कोरोना विषाणूविरोधात आयुष्यभर संरक्षण देऊ शकते. ही लस घेतल्यानंतर कोरोना विषाणूविरोधात अतिशय मजबूत रोगप्रतिकाशक्ती तयार होते अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.
कोरोना विषाणूच्या दोन व्हेरिएंटविरोधात मॉडर्ना लसीची चाचणी घेण्यात आली. त्या दोन्ही व्हेरिएंटविरुद्ध मॉडर्ना लस प्रभावी ठरली. कोरोना लस टोचण्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरात मुबलक प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या. त्यामुळे मॉडर्ना लस घेणाऱ्या व्यक्तींना कोरोनापासून अनेक वर्षे किंवा आजीवन संरक्षण मिळू शकतं. याशिवाय ही लस घेणाऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचीदेखील गरज भासणार नाही.