नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने दिव्यांग आणि आजारी लोकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले की, आता दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना कोरोनावरील लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रात जाण्याची गरज नाही आहे. दिव्यांग आणि आजारी लोकांना घरीच लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची नोंदणी करावी लागणार नाही. ( Corona vaccine will be given to the disabled and sick people at home)
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, जे लोक लसिकरण केंद्रात येऊ शकत नाहीत, त्यांना घरीच लस देण्याची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी त्यांना कुठेही नोंदणी करावी लागणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की, आमची लस सुरक्षित आहे. तसेच ही लस घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही जी व्यवस्था आणणार आहोत ती सुरक्षित प्रभावी, पोषण आणि सहाय्यक असेल. यामध्ये एसओपीचे पालन केले जाईल. त्यासाठी आदेश जारी केले जातील. तसेच त्यामध्ये स्थानिक टीम सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, सुमारे दोन तृतियांश प्रौढ लोकसंख्येला कोरोनावरील लसीचा एक डोस दिला गेला आहे. १८ वर्षांवरील ६६ टक्के लोकांना किमान एक डोस मिळालेला आहे. तर सुमारे २५ टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. हे यश उल्लेखनीय आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, कोरोनावरील लसीचा पहिला डोस आतापर्यंत सुमारे ६२ कोटी लोकांना मिळाला आहे. तर दुसरा डोस साडे २१ कोटी लोकांना मिळाला आहे. ९९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला आणि ८४ टक्के कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. १०० टक्के फ्रंट लाईन वर्कर्सना पहिला डोस आणि ८० टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. तसेच देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या देशात कोरोनाचे तीन लाख १ हजार सक्रिय रुग्ण आहेत. तर रिकव्हरी रेट हा ९७.८ टक्के एवढा आहे. रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाचे एक लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण हे केरळमध्ये तर ४० हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.