नवी दिल्ली - गेल्या पावणे दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव अद्याप कमी झालेला नाही. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या प्रत्येकाला कोरोनाविरोधातील लस दिली जात आहे. भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. (Corona Vaccination in India) तर अमेरिका, ब्राझीलसह जगातील अनेक देशांमध्ये लसीचा तिसरा म्हणजेच बुस्टर डोस दिला जात आहे. मात्र भारताने कोरोनावरील लसीच्या बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यादरम्यान, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाविरोधातील लसीच्या तिसऱ्या डोसबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. (Coronavirus vaccine booster dosage is not required in India at present, The Director of AIIMS, Dr. Guleria made it clear)
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, भारतामध्ये सध्यातरी बुस्टर डोस देण्याची गरज नाही आहे. सध्यातरी देशाचे प्राधान्य सर्वांना लस मिळण्याकडे असले पाहिजे. आतापर्यंत ज्यांना लस मिळालेली नाही, अशा लोकांचे लसीकरण करण्यावर आपण लक्ष दिले पाहिजे. त्यातही हाय रिस्क गटातील लोकांच्या लसीकरणावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. अनेक आरोग्य कर्मचारी, वरिष्ठ नागरिक तसेच आधीपासून आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी लस घेतलेली नाही. हे असे लोक आहेत ज्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी गुलेरिया यांनी लसीच्या बुस्टर डोसबाबत सांगितले होते की, भारताजवळ लसीचा तिसरा डोस देण्यासाठीच्या आवश्यकतेबाबत पुरेशी माहिती नाही आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत या संदर्भातील संपूर्ण डेटा मिळू शकतो. अनेक देशांमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिेकेमध्येही हाय रिस्क ग्रुपमधील लोकांना बुस्टर डोस देण्याची घोषणा झाली होती.
दरम्यान, गुलेरिया यांनी अँटिव्हायरल किंवा औषधांसाठी रिसर्चमधील गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला आहे. याचा उपयोग कोविड-१९च्या उपचारांमध्ये केला जाऊ शकतो. याबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही अजूनही कोविड-१९ विरोधात कुठल्याही विशिष्ट्य अँटीव्हायरल ऐवजी अनेक अन्य औषधांचा वापर करत आहोत. तसेच दुर्दैवाने बहुतांश गुंतवणूक ही लस विकसित करण्यामध्ये खर्च झाली आहे. मात्र आम्ही प्रत्यक्षात अँटीव्हायरलच्या एका औषधासाठीच्या संशोधनामध्ये एवढी गुंतवणूक केली नाही. जे या विषाणूविरोधात प्रभावी ठरले असते.