नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका देशाला बसला आहे. दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला असून, कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी कोरोनाविरोधातील लसीकरण कधी सुरू होणार? तसेच या लसीकरणासाठीच्या चाचण्या कधी सुरू होणार? अशी विचारणा केली जात आहे. दरम्यान, याबाबतची मोठी घोषणा केंद्र सरकारच्यावतीने नीती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी केली आहे. (COVAXIN has been approved by the DCGI for Phase II/III clinical trials in the age group of 2 to 18 years. trials will begin in the next 10-12 days)
नीती आयोगाचे सदस्य (वैद्यकीय) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने कोव्हॅक्सिन या लसीची २ ते १८ वयोगटामधील लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. आता या वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिनची चाचणी ही येत्या १० ते १२ दिवसांमध्ये सुरू होईल.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पालकांपासून ते सरकारपर्यंत सर्वांचीच चिंता वाढलेली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेपूर्वीच दुसऱ्या लाटेमधून समोर आलेली लहान मुलांमधील संसर्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी आहे. कर्नाटकमध्ये गेल्या १५ दिवसांत १९ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर दिल्लीमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांमध्ये कोरोनाची विचित्र लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये सुमारे १० वर्षांच्या वयोगटातील मुलांमध्ये गॅस्ट्रोएंटेरायटीसचाही समावेश आहे. काही मुलांमध्ये त्वचेवर व्रण आणि अन्य त्वचारोग दिसून येत आहेत.